महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये सर्व नागरिकांचे होणार मोफत लसीकरण


नवी दिल्लीः देशात सध्या कोरोनाविरोधातील लढाईत लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा या मोहीमेचा १०० वा दिवस आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. २४ एप्रिलपर्यंत ९९ दिवसांमध्ये १४ कोटी ८ लाख २ हजारांहून अधिक नागरिकांचे म्हणजे १० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. यात ११ कोटी ८५ लाख असे नागरिक आहेत, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. २ कोटी २२ लाख नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. कोरोनाची तिसरी किंवा पुढची कुठलीही लाट रोखण्यासाठी देशातील ७० टक्के जनतेचे लसीकरण होणं गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

देशात आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होत असून केंद्र सरकारने आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. पण आता १८ ते ४५ वर्षांदरम्यानच्या नागरिकांनी राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थेनुसार लस घ्यावी किंवा खासगी हॉस्पिटल्समध्ये जाऊन लस घ्यावी, असा निर्णय यावेळी केंद्र सरकारने घेतला आहे. याचा अर्थ या वयाच्या नागरिकांना केंद्र सरकारकडून लस मोफत मिळणार नाही. पण ४५ वर्षांवरील नागरिकांना पूर्वी प्रमाणेच मोफत लस दिली जाईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह ११ राज्यांनी नागिरकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याची घोषणा केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लस महाराष्ट्रात १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, केरळ, आसाम, झारखंड, गोवा, आणि सिक्कीममध्ये सर्व नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे.