खुद्द यमाला सुद्धा घ्यावी लागते कालभैरवाची परवानगी


लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज वाराणसी मतदारसंघातून २६ एप्रिल रोजी भरला त्यापूर्वी त्यांनी काशीचा कोतवाल अशी ख्याती असलेल्या कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे आणि नंतर उमेदवारी अर्ज भरल्याचे चित्रण आपण टीव्हीवर पहिलेच असेल. २६ एप्रिलला कालाष्टमी होती आणि या वैशाख कृष्ण अष्टमीला देशभरातील भैरव मंदिरातून बाबा भैरवनाथ म्हणजे कालभैरवाची पूजा अर्चा केली जाते. वाराणसी मधील कालभैरव मंदिर खूपच प्रसिद्ध असून या शिवनगरीचा तो कोतवाल आहे असे मानले जाते. त्यामुळे वाराणसीत बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतल्यावर जर कालभैरवाचे दर्शन घेतले नाही तर विश्वनाथाचे दर्शन अपूर्ण राहते अशी श्रद्धा आहे.

या मंदिराचा इतिहास सांगतो, हे मंदिर प्राचीन आहे आणि बाजीराव पेशव्यांनी १७१५ मध्ये ते दुसऱ्यांदा बांधले. मात्र वास्तूशास्त्रानुसार त्यात अजूनही काही बदल केला गेलेला नाही. हे मंदिर तंत्रशैलीवर आधारित आहे. आणि ईशान्यकोण हा तंत्रसाधनेसाठी महत्वपूर्ण आहे.


या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की, कालभैरव ब्रह्महत्येच्या पापमुक्तीसाठी काशी मध्ये तप करत होता. तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला या शहराचा कोतवाल म्हणून तुझी प्रसिद्धी होईल असा आशीर्वाद दिला. जेथे भैरव तप करत होता तेथेच त्याचे मंदिर बांधले गेले. धार्मिक मान्यता अशी आहे कि वाराणसीतील कुणालाही मृत्यू देण्यापूर्वी खुद्द यमदेवालाही कालभैरवाची परवानगी घ्यावी लागते. त्याच्या परवानगीशिवाय यम काहीही करू शकत नाही. ज्या कुणाला ग्रहदोषामुळे आयुष्यात खूप कष्ट करावे लागतात आणि तरीही यश मिळत नाही त्याने कालभैरवाचे दर्शन घेतले तर हे दोष दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मोगल शासक औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर नष्ट केले तेव्हा कालभैरव मंदिर तोडण्यासाठी त्याने सैनिक पाठविले. या सैनिकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांचा एक कळप चाल करून आला आणि ही कुत्री काही सैनिकांना चावली. त्याबरोबर ते सैनिक पिसाळले आणि त्यांच्याच साथीदारांना चावू लागले. हे पाहताच औरंगजेब जीव वाचविण्यासाठी पळाला आणि त्याने त्याच्या अंगरक्षकाकडून त्याच्याच सैनिकांना ठार केले अशी कथा सांगतात. कोतवाल कालभैरवाचे वाहन कुत्रा आहे हे विशेष.

Leave a Comment