वॉशिंग्टन विद्यापीठाचा इशारा; भारतात कोरोनामुळे दररोज होणार ५,००० मृत्यू ?


नवी दिल्ली – कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही भयावह परिस्थिती दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झाली आहे. तीन लाखांहून अधिक नागरिक दररोज पॉझिटिव्ह आढळून येत असतानाच वाढत्या मृत्यूंच्या संख्येने काळजीत भर टाकली आहे. मागील काही दिवसांपासून देशात दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे, असे असतानाच अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने भारतीयांच्या चिंतेत आणखी भर टाकणारा इशारा दिला आहे. मे महिन्याच्या मध्यावधीत भारतात दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतात कोरोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनमुळे कोरोना प्रादुर्भावाचा वेग प्रचंड वाढला आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, वाढत्या रुग्णसंख्येपाठोपाठ आता मृत्यूंचा आकडाही वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून देशात दोन हजारांहून अधिक कोरोना मृत्यूची नोंद होत आहे. त्यात आता वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने (IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.

कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने केला. १५ एप्रिल रोजी या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, या अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात कोरोनाच्या आपत्तीमुळे आणखी वाईट होईल, असा इशारा इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासाच्या आधारे दिला आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे.

चालू वर्षात भारतात कोरोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज इन्स्टिट्यूटने व्यक्त केला आहे. भारतात १० मे रोजी ५ हजार ६०० जणांचा कोरोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, देशात १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत ३ लाख २९ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असेही अभ्यासात इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने म्हटले आहे.

अभ्यासात मास्कच्या वापराबद्दलही काही निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. मास्कच्या वापरामुळे एप्रिलच्या अखेरीपर्यंत हा आकडा ७० हजारांपर्यंत कमी होऊ शकतो. सप्टेंबर २०२० च्या मध्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावधी पर्यंत कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घसरण होत होती. एप्रिलमध्ये अचानक यात वाढ झाली.

पहिल्या लाटेपेक्षा दुप्पटीने कोरोना रुग्णवाढ दुसऱ्या लाटेत झाल्याचे दिसून आले. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या ७१ टक्क्यांने वाढली आणि दररोज होणारे मृत्यू ५५ टक्क्याने वाढले. कोरोना नियमावलीचे पालन न केल्यामुळे, सोहळ्यांना झालेली गर्दी आणि मास्क वापरण्यास नागरिकांकडून नकार दिल्यानेच ही वाढ झाल्याचे संस्थेने म्हटले आहे.