जळगाव; कोरोना नियमांची पायमल्ली करत लग्नाचा बार उडणाऱ्या वधू-वराच्या मातापित्यांवर गुन्हा


जळगाव : राज्य शासनाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे निर्देश असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवण्यात आला. महापालिकेने याविरोधात कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर वधू-वराच्या मातापित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे समजते.

अनेक लोकांचे कोरोनामुळे बळी जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर पालन करीत धूमधडाक्यात विवाह समारंभ टाळणे अपेक्षित आहे. पण शासन निर्णयाची पायमल्ली करत धूमधडाक्यात विवाह करणे जळगावातील वर-वधूच्या मातापित्याला चांगलेच महागात पडले आहे.

जळगाव शहरातील योगेश्वरनगर परिसरात भागवत चौधरी आणि धरण गाव येथील राजेंद्र चौधरी यांच्या मुलगा आणि मुलीचा विवाह संपन्न झाला. या विवाह समारंभ ठिकाणी महापालिकेने छापा मारला असता, 150 ते 200 जण विनामास्क आणि गर्दी करुन असल्याचे आढळून आल्यानंतर मनपाच्या पथकाने कारवाई करत वर आणि वधू पित्याला 50 हजार रुपयांचा दंड करण्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यापुढेही शासन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.