४५ मिनिटात रिपोर्ट देणाऱ्या ‘कोविरॅप’ ला व्यावसायिक उत्पादनास मान्यता

आयआयटी खरगपूर येथील प्रो. सुमन चक्रवर्ती, डॉ. अरिंदम मंडळ यांच्या टीमने अवघ्या ४५ मिनिटात कोविड रिपोर्ट देणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली असून कोविरॅपच्या व्यावसायिक उत्पादनास मंजुरी दिली गेली आहे. बुधवारी कोविरॅपचे व्यावसायिक लाँचिंग केले गेले असून केवळ करोना साठीच नाही तर अन्य संक्रामक रोगांच्या चाचण्या करण्यासाठी सुद्धा ते वापरता येणार आहे.

देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यात हे स्वस्त उपकरण फार महत्वाचे ठरणार आहे. हे पोर्टेबल उपकरण असून त्यात लाळेचे नमुने तपासून ४५ मिनिटात तपासणी अहवाल मिळतो. या प्रक्रियेत रुग्णाच्या नमुन्यातील आरएनए वेगळा काढण्याची गरज नाही. या किट सह मोफत मोबाईल अॅप सुद्धा उपलब्ध करून दिले गेले आहे. तपासणी करताना रुग्णाच्या नाक आणि तोंडातून नमुना घेतला जातो. यात द्रावण मिसळून नमुना पातळ करण्याची गरज नाही. पोर्टेबल उपकरणात त्याची तपासणी करताना वैयक्तिक हस्तक्षेप करावा लागत नाही.

हे उपकरण वापरण्यासाठी कुशल प्रशिक्षित लोकांची गरज नाही तर अकुशल लोकांना सुद्धा त्याची पद्धत दाखविल्यावर ते वापरता येते. केवळ ४५ मिनिटात रिपोर्ट मिळत असल्याने सामुहिक संक्रमण रोखण्यात हे उपकरण महत्वाची भूमिका बजावू शकेल असा दावा केला जात आहे.

व्यावसायिक उत्पादनासाठी रॅपिड डायग्नोस्टिक ग्रुप कंपनीज भारत व ब्रामेरटन होल्डिंग एलएलसी अमेरिका याना परवाना दिला गेला आहे. या उपकरणाच्या पेटंट साठी भारताबरोबरच अन्य देशातही अर्ज केले गेले आहेत असे समजते.