हिंदू धर्मियांसाठी पूजनीय आहेत नाग नागिणी

shesh
हिंदू धर्म पुराणात अनेक नागांचा उल्लेख असून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. महाभारतात अनेक पूजनीय आणि बलाढ्य नागांचा उल्लेख येतो. आणि त्यांच्या प्रेम आणि द्वेषाच्या कहाण्या सांगितल्या जातात. त्यातील काही नाग आणि नागिणींविषयी येथे माहिती देत आहोत.

शेष हा सर्वश्रेष्ठ नाग मानला जातो. त्याच्या फड्यावर पृथ्वी तोलली गेली आहे अशी कल्पना असून तो भगवान विष्णूचा परम भक्त आहे आणि विष्णू याच नागावर पाताळलोकात विश्रांती घेतात असा समज आहे. असे म्हणतात शेष त्याचे भाऊ, बहिणी, आई, सावत्र आई यांच्यातील कलहामुळे संसारातून निवृत्ती घेऊन विरक्त झाला. त्याची आई, सावत्र आई विनिता आणि तिचा मुलगा गरुड यांच्यात वैर होते त्यामुळे तो सर्व त्याग करून गंधमादन पर्वतावर तपस्या करत होता, त्याला प्रसन्न होऊन ब्रह्माने वरदान दिले आणि पाताळाचा राजा बनविले. तो विष्णूचा परमभक्त आहे आणि त्याला १००० फड्या आहेत असाही समज आहे. पुराणात लक्ष्मण आणि बलराम हे त्याचे अवतार मानले जातात.

vasuki
वासुकी नाग हा शेषाचा भाऊ. पण शेषाने विरक्ती घेतल्यावर हा राजा झाला. तोही पाताळात राहतो आणि शंकराचा भक्त आहे. शंकराच्या अंगावर तोच असतो. अमृत प्राप्तीसाठी जेव्हा देव दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा दोर म्हणून वासुकी नाग होता. हा नाग भीमकाय आहे आणि लांबलचक आहे असे मानतात. त्रिपुरासुराशी युद्ध करताना शंकराने वासुकीलाच धनुष्याची दोरी बनविले होते. यांनेच नाग वंश राहावा म्हणून त्याची बहिण जरत्कारू या ऋषीला दिली आणि त्यांना झालेल्या अगस्ती या मुलाने जनमेजय राजाने चालविलेल्या सर्पयज्ञात तक्षकाचा बळी जाण्यापासून त्याचे रक्षण केले आणि सर्पयज्ञ थांबविला.

snakes
तक्षक हाही पाताळात राहणारा नाग देवाचा राजा इंद्र याचा भक्त मानला जातो. हा लाल रंगाचा सर्प. यानेच परीक्षित राजाला दंश केला होता त्यामुळे चिडलेल्या परीक्षित राजाच्या मुलाने जनमेजयाने सर्पयज्ञ सुरु केला आणि त्यात नागांचा आहुती पडू लागल्या. तेव्हा घाबरलेला तक्षक इंद्राकडे गेला आणि त्याचा मागे लपला. पण इंद्रासह तो स्वर्गातून खाली येऊ लागला तेव्हा अगस्ती ऋषींनी मंत्रोच्चार करून त्याला आकाशातच थांबविले आणि त्याला जीवदान मिळाले.

kaliya
कालिया हा यमुना नदीत त्याच्या परिवारासह राहत होता. पण त्याने यमुनेचे पाणी त्याच्या विषाने दुषित केले तेव्हा मथुरेतील आणि वृंदावनातील लोकांना आणि गाईगुरांना वाचविण्यासाठी श्रीकृष्णाने यमुनेत उडी घेऊन कालिया मर्दन केले आणि त्याला दुसरीकडे जाऊन राहण्याची आज्ञा केली होती. मनसादेवी हि नागीण वासुकीची बहिण होती. हरिद्वारच्या हरी कि पौडी जवळ असलेल्या पहाडावर तिचे मंदिर आहे. शिवाची ती मानसपुत्री मानली जाते तर एका कथेनुसार वासुकीच्या आईने कन्येची एक मूर्ती तयार केली होती त्याला शिवाच्या विर्याचा स्पर्श झाला आणि त्यातून मनसा जन्माला आली. ही विषकन्या होती. हिचीच पूजा केल्याने युधिष्ठीर युद्धात विजयी झाला अये मानले जाते.

उलूपी हीसुद्धा नाग कन्या होती. कौरव्य नागाची ही मुलगी. अर्जुन आणि कृष्ण यांनी खांडववन जाळले तेव्हा त्यात अनेक नाग कुटुंबे जाळली. त्यावेळी कौरव्य नाग पाताळात गेला आणि त्याने जीव वाचविला पण अर्जुनाचा बदला घेण्यासठी त्याने उलुपीला पाठविले. ती संमोहन कलेत पारंगत होती पण अर्जुनाला पाहताच ती त्याच्यावर मोहित झाली. अर्जुनाची ती पत्नी बनली व त्यांना इरावन नावाचा मुलगा झाला असे महाभारत सांगते.

Leave a Comment