सौदी शाळेत शिकविले जाणार रामायण, महाभारत

सौदी अरेबिया मध्ये शालेय पाठ्यक्रमात बदल केला गेला असून या नव्या पाठ्यक्रमात रामायण आणि महाभारत यांचा समावेश केला गेला आहे. सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी साठी व्हिजन २०३० योजना आखली आहे आणि अभ्यासक्रमातील बदल हा त्याचाच एक भाग आहे.

प्रिन्स मोहम्मद यांच्या मते अन्य देशांचे इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास गरजेचा आहे. नवीन शिक्षण धोरण आखताना याचा विचार केला गेला आहे. जागतिक स्तरावर महत्वपूर्ण असलेली भारतीय संस्कृती, योग आणि आयुर्वेद याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. या अभ्यासक्रमात इंग्रजी सुद्धा अनिवार्य केले गेले आहे.

नवे शैक्षणिक धोरण उदार, सहिष्णू आणि सर्व समावेशी करण्यावर भर दिला जात आहे. महाभारत, रामायण, कर्म, बौद्ध, हिंदू धर्म यामुळे देशात कुशल, सुशिक्षित कार्यबल निर्माण होईल आणि वैश्विक अर्थव्यवस्थेतील स्पर्धेत टिकता येईल असे सांगितले जात आहे. अन्य देशातील लोकांशी सांस्कृतिक संवादाच्या माध्यमातून मानव कल्याण सहाय्य मिळू शकते आणि त्यासाठी इंग्रजी अनिवार्य केले गेले आहे असा खुलासाही केला गेला आहे.