जुन्या अंतराळ स्टेशन मधून रशियाने काढले मन

जुन्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मधून वेगळे होण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. २०२५ पर्यंत रशिया यातून पूर्ण अंग काढून घेणार आहे. रशिया स्वतःच्या मालकीचे वेगळे अंतराळ स्टेशन लाँच करण्याच्या तयारीत आहे. सर्व वेळेवर पार पडले तर २०३० मध्ये रशिया त्यांचे स्वतःचे अंतराळ स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करेल असे समजते.

रशियाच्या मताने जुने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन खुपच जुने झाले असून त्यातील काही भाग आता उपयोगाचे राहिलेले नाहीत. १९९८ पासून हे स्टेशन कार्यरत आहे. रशिया बरोबर अन्य १६ देश सुद्धा या योजनेत सहयोगी आहेत. अमेरिका आणि रशिया सर्वाधिक सहयोगाचा हा कार्यक्रम मानला जातो. मात्र गेले काही दिवस रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकी नंतर ते अधिक तणावाचे बनले आहेत. त्यामुळेच रशियाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मधून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचा तर्क आहे.

रशियन अंतराळ संस्था रॉसकोसमॉस ने देशाचे स्वतःचे स्वतंत्र अंतराळ स्टेशन स्पेस मध्ये स्थापित केले जाणार असल्याची घोषणा नुकतीच केली होती. २०३० च्या सुमारास ही मोहीम पार पाडली जाणार आहे. या केंद्रावर आर्टीफीशीयल इंटेलिजन्स रोबोंचा वापर केला जाणार आहे. हे स्टेशन माणसे चालविणार नाहीत तर त्याची देखरेख रोबो करणार आहेत. या स्टेशन वर माणसे प्रवासी म्हणून उपस्थिती लावतील.

दरम्यान सध्याचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन जेव्हा पूर्ण बंद केले जाईल तेव्हा त्याला पॅसिफिक समुद्रातील पॉइंट निमो येथे चिरविश्रांती दिली जाणार आहे. हे स्थळ उपग्रहांचे कबरीस्थान म्हणून ओळखले जाते.