चेहेरे लक्षात ठेवण्यात महिला अग्रेसर

एकदा चेहरा पहिला की मी तो विसरत नाही असे अनेकजण म्हणताना आपण ऐकतो. ज्यांना ही देणगी नाही असे लोक चेहरे न विसरणार्‍यांचा कदाचित हेवा ही करत असतील. मात्र येथेही पुरूषांवर महिलांचे वर्चस्व आहे ही गोष्ट आता संशोधनातूनच सिद्ध झाली आहे. कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठातील वैज्ञानिकांनी या बाबतीत संशोधन केले आहे.

या संशोधनात सहभागी असलेल्या वैज्ञानिक जेनीफर हेन्स सांगतात की मुळात हे संशोधन भिन्नलिगी व्यक्तींच्या स्मरणशक्तीबाबत सुरू होते. मात्र त्यात असे आढळले की पुरूषांच्या तुलनेत महिला नवीन व्यक्तींचे चेहरे अधिक प्रमाणात लक्षात ठेवतात. याचे महत्त्वाचे कारण असे की महिला त्यांच्याही न कळत समोर येणार्यात नव्या व्यक्तीच्या चेहर्‍याचे म्हणजे फिचर्सचे अधिक निरीक्षण करतात. म्हणजे डोळे कसे आहेत, नाक कसे आहे, जिवणी कशी आहे वगैरे वगैरे. त्याचा फायदा असा होतो की त्या सबंधित व्यक्तीचा चेहरा दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतात.

वैज्ञानिकांनी या प्रयोगात सामील होण्यासाठी ज्या लोकांना समाविष्ट करून घेतले होते, त्यांचे डोळे नव्या अनोळखी व्यक्तीवरून कसे फिरतात याची निरीक्षणे नोंदविली आणि त्यासाठी त्यांनी आय ट्रॅकिग तंत्रज्ञानाचा वापर केला. प्रयोगात सामील झालेल्या लोकांना अनेक चेहरे संगणकावर दाखविले गेले. त्या चेहर्‍यांना कांही नांवे ही दिली गेली होती. सतत चार दिवस हाच प्रयोग केला तेव्हा संशोधकांना असे आढळले की महिला अनोळखी व्यकतींच्या फिचर्ससंबंधी त्यांच्या नकळतच मनात नोंदी करत जातात. कारण बहुसंख्य महिलांचे डोळे हे चेहरे निरखताना एकाच पॅटर्नमध्ये फिरत होते.

संशोधकांनी त्यावरून असा ही तर्क लढविला आहे की एखाद्याच्या डोळ्याच्या हालचालीचा पॅटर्न महिलांचे डोळे जसे फिरतात त्याप्रमाणे प्रयोगातून बदलता आला तर त्याची स्मरणशक्ती वाढू शकेल. विशेषतः जन्मतःच कमी स्मरणशक्ती घेऊन जे जन्माला येतात त्यांच्यासाठी तर हे वरदानच ठरू शकेल असाही या संशोधकांचा अंदाज असून त्यावरही आता आणखी प्रयोग केले जाणार आहेत असे समजते.

Leave a Comment