भारताने कोरोनाबाधितांच्या वाढीबाबत आता अमेरिकेलाही टाकले मागे


नवी दिल्ली : कोरोनाबाधितांच्या संख्येचा देशात दररोज नवीन विक्रम होत असून त्यात काल दिवसभरात 3.32 लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोजच्या कोरोनाबाधितांच्या वाढीबाबत आता भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. गुरुवारची कोरोनाबाधितांची ही संख्या जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येच्या वाढीचा एक विक्रम आहे. देशात गुरुवारी 1,93,279 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून देशातील आरोग्य यंत्रणेवर त्यामुळे प्रचंड ताण येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी वर्च्युअल माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन काही उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख कायम असून काल दिवसभरात राज्यात 67 हजार 13 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर आज 62 हजार 298 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34 टक्के झाले आहे. आज राज्यात 568 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.