विरारच्या कोरोना रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी : राजेश टोपे


मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागण्याचा घटनाक्रम कायम असून आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. 13 रुग्णांचा होरपळून या आगीत मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याची भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचे समजते. एसीचा अचानकपणे स्फोट झाल्यामुळे केवळ दोन ते तीन मिनिटात सर्वत्र धुर पसरल्यामुळे रुग्णांना वाचवायला फार कमी वेळ मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे.

हा स्फोट का झाला? कसा झाला? याची चौकशी करण्यात येईल, असे सांगत राजेश टोपे म्हणाले की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे दवाखान्यांना हातही लावता येत नाहीत. पण फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.

ही आग खासगी मालकीचे असलेल्या या रुग्णालयातील आयसीयूमधील एसीचा स्फोट झाल्याने लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे.

या रुग्णालयातील अनेक रुग्ण हे ऑक्सिजनवर होते. रात्री साडे तीन वाजता ही आग लागली होती. त्यावेळी रुग्णालयात केवळ दोन नर्स उपस्थित असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ इतरत्र हालवण्यात आले नाही. सध्या 80 रुग्णांना इतरत्र शिफ्ट करण्यात येत आहे. विरारची घटना ही वेदनादायी घटना आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी सांगितले.

दरम्यान विरारमधील या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये, तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.