अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; बँकेने केला Cash withdrawal नियमात मोठा बदल


नवी दिल्ली : सध्या कोरोनाच्या संकटकाळात अनेकांची आर्थिक परवड होत आहे. याच काळात ग्राहक बँकेत जमा केलेले आपले पैसे काढत आहेत. दरम्यान आता देशातील एका मोठ्या बँकेने अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. ही बातमी अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची आहे. त्यानुसार अॅक्सिस बँकेमधून पैसे काढणे हे आता महाग झाले आहे. बचत खात्यामधून कॅश काढणे आणि एसएमएस शुल्क बँकेने वाढवले आहे.

1 मे 2021 पासून बँकेचे बदललेले हे नवीन नियम लागू होतील. अ‍ॅक्सिस बँक 1 मे 2021 पासून ग्राहकांना त्यांच्या खात्यात सरासरी किमान मासिक 15,000 रुपये बॅलन्स ठेवावे लागतील. ही मर्यादा सध्या 10,000 रुपये आहे. तसेच बँकेने प्राइम आणि लिबर्टी बचत खात्यात सरासरी किमान बॅलन्स मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे.

आपल्या बचत खाते धारकांना अ‍ॅक्सिस बँक 1 महिन्यात 4 ट्रान्झॅक्शन किंवा 2 लाख रुपये विनामूल्य काढण्यास परवानगी देते. यानंतर रोख रक्कम काढल्यावर प्रति 5 हजार रुपयांवर जास्तीत जास्त 150 रुपये चार्जेस घेते. आता बँकेने फ्री ट्रान्झॅक्शननंतर लागणारे चार्जेस 5 रूपयांवरून 10 रुपये केले आहेत. तर जास्तीत जास्त 150 रुपये चार्जेस कायम ठेवण्यात आले आहेत. मिनीमम बॅलन्स अकाऊंटमध्ये नसेल तर 50 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत चार्जेस आकारण्यात येणार आहेत.

तसेच अॅक्सिस बँकेकडून आता प्रति एसएमएसवर 25 पैसे आकारले जाणार आहेत. सध्या दरमहा 5 रुपये एसएसएस चार्जेस आहे. 1 जुलै 2021 पासून हे नवीन दर लागू होतील. ओटीपी आणि बँकेने पाठवलेल्या प्रमोशनल एसएमएसवर चार्जेस नसतील.

सॅलरी अकाऊंटच्या नियमातही अ‍ॅक्सिस बँकेने बदल केले आहेत. सॅलरी अकाऊंट जर 6 महिन्यांपेक्षा जास्त जुने असेल आणि कोणत्याही 1 महिन्यात पगार क्रेडिट झाला नसेल तर दर महिना 100 रुपये शुल्क आकारले जाईल. त्याचबरोबर जर आपल्या खात्यात 17 महिन्यांपर्यंत ट्रान्झॅक्शन झाले नसेल, तर 18 व्या महिन्यात 100 रुपये शुल्क आकारले जाईल.