ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – गेल्या २४ तासात दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडूनच देण्यात आली आहे. आज सकाळी ८ वाजता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोन तास पुरेल एवढाच सध्या ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये अनेक राज्यांप्रमाणे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून उच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. गंगाराम रुग्णालय हे दिल्लीमधील खासगी रुग्णालय असून ६७५ बेड्सचे हे एक नामांकित रुग्णालय आहे. पण तिथेही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून २५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ गंभीर रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. फक्त दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा सध्या शिल्लक आहे. व्हेटिंलेटरदेखील नीट काम करत नाही आहेत. आयसीयू आणि इमरजेन्सीमध्ये सध्या मॅन्यूअल व्हेटिंलेशन सुरु आहे. मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. सध्या ६० रुग्णांचा जीव धोक्यात असून तात्काळ मदतीची गरज आहे. रुग्णालयाने तात्काळ ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.