रशियन हॅकर ग्रुपने अॅपल कडे मागितली ३७५ कोटींची खंडणी

जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणतीही साईट भेदून त्यावरची गुप्त माहिती मिळवायची आणि ही माहिती विकून किंवा खंडणी मागून पैसे गोळा करायचे प्रमाण वाढले आहेच पण सायबर हल्ले करणाऱ्या या हॅकर्सचा धीटपणा ही वाढत चालल्याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ‘आरएव्हिल’ या रशियन हॅकर ग्रुपने, युजर्स आणि स्वतःच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर असलेल्या नामाकिंत अॅपल कंपनीला त्यांचे सावज बनविले आहे. कंपनीच्या भविष्यातील उत्पादनांची माहिती लिक करण्याची धमकी या ग्रुप ने दिली आहे. हा धोका टाळायचा असेल तर ३७५ कोटींची खंडणी द्यावी अशी या ग्रुपची मागणी आहे. अॅपलच्या स्प्रिंग लोडेड इव्हेंट पूर्वी या ग्रुपने संबंधित माहिती मॅकबुक व अन्य अॅपल प्रोडक्ट उत्पादकांकडून सायबर हल्ला करून मिळविली आहे असे सांगितले जात आहे.

सर्वप्रथम या ग्रुपने तैवान मधील क्वांटा कंपनीला त्यांचे सावज बनविले होते. ब्लूमबर्गने सुद्धा त्यांच्या अहवालात डेटा लिक संदर्भातला खुलासा केला होता. क्वांटा कंपनीने काहीच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी त्यांचा मोर्चा कंपनीचा बडा क्लायंट, अॅपल कडे वळविला. हॅकर्सनी डार्क वेब पोर्टलवर हा खुलासा करतानाच अॅपलच्या भविष्यातील काही उत्पादनांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी २१ स्क्रीन शॉट पोस्ट केले असून १ मे पर्यंत खंडणी मिळाली नाही तर नवीन आगामी आयमॅक बद्दल माहिती लिक करण्याची धमकी दिली आहे. त्यांनी एमआय मॅकबुक एअरचे डिझाईन, अनरीलीज्ड लॅपटॉपचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत.

स्क्रीन शॉट उघडल्याबरोबर एक वॉर्निंग डिस्प्ले होते आहे. त्यात ही प्रॉपर्टी अॅपलची असून त्वरित परत करावी असा इशारा आहे. लिक केलेली माहिती अॅपलच्या उत्पादनांचीच आहे याचा हा मोठा पुरावा मानला जात आहे. खंडणी दिली नाही तर रोज एक नवीन डेटा लिक करण्याची धमकीही दिली गेली आहे.