भारतीय युवा महिला मुष्टीयोद्ध्यांची विश्व स्पर्धेत सुवर्ण लूट

एआयबीए युथ पुरुष आणि महिला विश्वस्पर्धेत भारतीय युवा महिला मुष्टियोद्धयांनी अक्षरशः सोने लुटले आहे. पोलंडच्या किल्से येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत ७ भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केलाच पण सर्वानी सुवर्ण पदकाची कमाई केली. ही कामगिरी बजावून या खेळाडूंनी नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने पाच सुवर्ण पदकांची कमाई केली होती.

२०१९ च्या आशियाई युथ चँपियन बेबीरोजीसन चानू हिने उत्तम कामगिरी बजावत सुवर्ण पंच मारला. गीतिकाने ४८ किलो वजनी गटात, पूनमने ५७ किलो गटात, विंकाने ६० किलो गटात, अरुंधती चौधरीने ६९ किलो गटात तर थेक्चेम सानामया चानूने ७५ किलो गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. अल्फिया पठाणने ८१ किलो गटात सुवर्ण पदक जिंकले.

चानुने रशियाच्या वेलेरीया लीन्कोवाला हरविले तर गीतिकाने पोलंडच्या नतालिया डोमोनिकाला नमविले. पूनमने फ्रांसच्या स्तिल्नी ग्रोसवर विजय मिळविला तर विंकाने कजाकिस्तानच्या झुल्डोस श्यारवेतोवाला नमविले. अरुंधतीने पोलंडच्या बार्बराला हरविले तर मेरी कॉम अकादमीतून प्रशिक्षण घेतलेल्या सानाचामा चानूने कजाकिस्तानच्या दाना दिदाम हिला पाणी पाजले. अल्फियाने मोलोदोवाच्या डारिया कोजोख हिला हरविले. या सगळ्याने त्यांच्या लढती ५-० ने जिंकल्या.