ओला उभारणार जगातील सर्वात मोठे टूव्हीलर चार्जिंग नेटवर्क

भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडविण्याचे प्रयत्न सुरु असतानाच ओलाने जगातील सर्वात मोठे टू व्हीलर चार्जिंग नेटवर्क उभारण्याची योजना आखली आहे. ४०० शहरात १ लाखापेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट या योजनेअंतर्गत उभारले जाणार असून येथे १८ मिनिटात ७५ टक्के स्कुटर चार्ज होऊ शकणार आहे. हा चार्ज ७५ किमीचा प्रवास करण्यास पुरा पडू शकेल असा कंपनीचा दावा आहे.

ओलाने ऑटोमेटेड मल्टीलेव्हल चार्जिंग आणि पार्किंग सिस्टीम योजना तयार केली आहे. अर्थात त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक स्कुटर साठी या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. ओलाची इलेक्ट्रिक स्कुटर येत्या जुलै मध्ये लाँच केली जाणार आहे. चार्जिंग नेटवर्क योजनेत पहिल्या वर्षात देशातील १०० शहरात ५ हजाराहून अधिक चार्जिंग पॉइंट उभारले जातील. हे चार्जिंग पॉइंट सिटी सेंटर, बिझिनेस डीस्ट्रीक, मॉल, आय टी पार्क, ऑफिस संकुले, कॅफे अश्या जागी असतील.

ओला त्यांच्या ई स्कुटर बरोबर एक होम चार्जर देणार आहे. त्यासाठी इन्स्टॉलेशनची गरज नाही. फक्त गाडीत लावून प्लग चार्जिंग साठी रेग्युलर भिंतीतील सॉकेट मध्ये घालायचा आहे. गेल्या वर्षी तामिळनाडू येथे २४०० कोटींची गुंतवणूक करून ओलाने पहिला ई स्कुटर कारखाना सुरु करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. येथे १० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. जगातील हे सर्वात मोठे इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन केंद्र असून येथे वर्षाला २० लाख दुचाकी तयार होणार आहेत. जूनपर्यंत हे उत्पादन सुरु होत असल्याची माहिती कंपनीचे भागीदार भावेश अग्रवाल यांनी दिली.