मंगळ ग्रहावर श्वसन योग्य ऑक्सिजन बनविण्यात नासा यशस्वी

नासाच्या पर्सीवरेस रोव्हरने मंगळ ग्रहावर नवा इतिहास रचला आहे. मंगळावरील वायूमंडळातून कार्बन डाय ऑक्साईड शुध्द करून त्यापासून श्वसन योग्य ऑक्सिजनची निर्मिती करण्यात आली आहे. दुसऱ्या ग्रहावर असे यश मिळविण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे भविष्यात मंगळावर मानवी वसाहत करण्याचा मार्ग सुकर झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

पृथ्वीपासून सात महिन्यांचा प्रवास करून १८ फेब्रुवारीला पर्सीवरेस रोव्हर मंगळावर पोहोचले आहे. ऑक्सिजन निर्मिती साठी टोस्टरच्या आकाराचे मॉक्सी उपकरण वापरले गेले असून त्याने मंगळाच्या वातावरणातून कार्बन डाय ऑक्साईड पासून ५ ग्रॅम ऑक्सिजन तयार केला. हा ऑक्सिजन अंतराळवीराला १० मिनिटे पुरू शकेल.

हे उपकरण एमआयटी ने डिझाईन केले असून त्यासाठी निकेल धातूच्या मिश्रणाचा वापर केला गेला. हे उपकरण ८०० डिग्री तापमान सहन करू शकते. इलेक्ट्रोलीसीसच्या माध्यमातून आत्यंतिक उष्णतेत कार्बन डाय ऑक्साईडचे अणु अलग करून त्यातून ऑक्सिजन तयार होतो. मंगळावर ९५ टक्के कार्बन डाय ऑक्साईडच आहे. पण मानवी वसाहत करताना पृथ्वीवरून इतका दीर्घ प्रवास करून ऑक्सिजन नेणे शक्य नसल्याने तेथेच ऑक्सिजन निर्माण करणे आवश्यक आहे. २०३३ पर्यंत मंगळावर मानवी वसाहत करण्याचा नासाचा प्रयत्न आहे.