सीताराम येचुरी यांच्या मुलाचे वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन


नवी दिल्ली : कोरोनामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे निधन झाले. तो अवघ्या 34 वर्षांचा होता. याबाबतची माहिती स्वत: सीताराम येचुरी यांनी ट्वीट करुन दिली.

34 वर्षीय आशिष येचुरी याला कोरोनाची लागण झाली होती. जवळपास दोन आठवड्यांपासून त्याच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. आशिष याच्या पश्चात कुटुंबात वडील सीताराम येचुरी, आई आणि धाकटी बहिण आहे.

सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, अतिशय दु:खाने सांगावे लागत आहे की, कोरोनामुळे आज सकाळी मी माझा मोठा आशिष येचुरीला गमावले. ज्यांनी आम्हाला आशा दिली आणि ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले…डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्यासोबत जे उभे राहिले, अशा सगळ्यांचे मी आभार मानतो.

दरम्यान तत्पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. वालिया यांच्या निधनाचे वृत्त आले होते. आज सकाळी शीला दीक्षित सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. वालिया यांचे निधन झाले. वालिया यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.