नितीन गडकरींमुळे महाराष्ट्राला दररोज मिळणार ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन !


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्राला विशाखापट्टणम येथील आयआयएनएल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून दररोज ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) ऑक्सिजन मिळणार आहे. विशाखापट्टणम येथून पुढील दोन दिवसांत पुरवठा सुरू होईल, यामुळे विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


देशभरातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे गडकरी यांनी ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर शहरात ऑक्सिजनचे टँकर आणि सिलेंडर उपलब्ध होत आहेत. यापूर्वी भिलाईमधून ६० टन द्रव्य ऑक्सिजन असलेले टँकर मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दररोज १५७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. ऑक्सिजनची मागणी बघता शहरातील ५० खाटापेक्षा जास्त असलेल्या रुग्णालयांनी हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केले आहे.