देशातील 1,78,841 रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात


नवी दिल्ली – देशात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येने जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. देशभरात पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 3,14,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, 1,78,841 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. यापूर्वी मंगळवारी देशात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेत 8 जानेवारी रोजी एका दिवसांत सर्वाधिक तीन लाख सात हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.

तर इकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस हजाराने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. काल दिवसभरात 67 हजार 468 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, काल 54 हजार 985 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के झाले आहे.

राज्यात काल एकूण 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.54 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 61 हजार 911 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून काल नोंद झालेल्या 568 मृत्यूंपैकी 303 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 160 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 105 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.