भारतीय हवाई दलाची राफेलची पहिली स्क्वाड्रन पूर्ण

बुधवारी रात्री उशिरा फ्रांस मधून आलेल्या चार राफेल लढाऊ विमानांमुळे भारतीय हवाई दलाची राफेलची पहिली स्क्वाड्रन पूर्ण झाली आहे. भारताला आत्तापर्यंत १८ राफेल विमाने मिळाली आहेत. भारतीय वायू दलाचे प्रमुख आरकेएस भदोरीया यांनी बुधवारीच या चार विमानांना फ्रांसच्या मेरीग्नेक बॉरडॉक्स एअरबेस वरून हिरवा कंदील दाखविला आणि ही विमाने ८ हजार किमीचा प्रवास कुठेही न थांबता करून भारतात दाखल झाली. त्यांना युएई आणि फ्रांस वायुदलाच्या मदतीने हवेतच इंधन पुरविले गेले.

हवाई दल प्रमुख भदोरिया सोमवारी ५ दिवसांच्या दौऱ्यावर फ्रांसला रवाना झाले आहेत. तेथेच त्यांनी या विमानांना निरोप दिला. राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी अंबाला बेस वर तैनात असून दुसरी तुकडी प. बंगालच्या हाशिमारा एअरबेस वर तैनात केली जाणार आहे. आणखी १८ राफेल विमाने या वर्षाअखेर भारताला मिळणार आहेत. करोना काळातही विमानांची डिलीव्हरी वेळेवर दिल्याबद्दल हवाई दलाने फ्रान्स कंपनीला धन्यवाद दिले आहेत.

३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी सप्टेंबर २०१६ मध्ये ५९ हजार कोटींचा करार केला गेला होता. दोन इंजिन वाल्या या विमानांची अणु हल्ला करण्याची क्षमता आहे. एकाचा वेळी १४ ठिकाणांना हे विमान टार्गेट करू शकते. एअर डीफेंस शिल्ड पासून हवेतून जमिनीवर, समुद्री हल्ले हे विमान करू शकते. हवेतून हवेत मिसाईल डागण्याची त्याची क्षमता आहे.