उद्योजक रतन टाटांनी आता या कंपनीत केली मोठी गुंतवणूक

टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती रतन टाटा यांनी कुठे कुठे नवी गुंतवणूक केली याकडे या क्षेत्रातील जाणकारांचे नेहमीच लक्ष असते. छोट्या कंपन्या आणि स्टार्टअप गुंतवणुकीचा विषय असेल तर सर्वप्रथम नाव समोर येते ते रतन टाटा यांचेच. टाटा यांनी नुकतीच मेलीट या लॉजिस्टिक कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याची बातमी आहे. ही गुंतवणूक नक्की किती याचा खुलासा झालेला नाही. गेल्या महिन्यात रतन टाटा यांनी एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधील प्रीतीश नंदी कम्युनिकेशन मध्ये गुंतवणूक केली आहे.

रतन टाटा यांची गुंतवणूक म्हणजे त्या कंपन्या नक्की चांगली कामगिरी बजावणार असे मानले जाते. मेलीट ही देशातील प्रमुख कंपन्यांबरोबर टाटा समूहातील मोठ्या कंपन्यांना कुरिअर, कार्गो, ३पीएल, मेलरूम प्रबंधन डिजिटल सुविधा, टपाल सेवा देते. कंपनी पुढच्या पाच वर्षात आणखी ५०० मेलरुम सुरु करणार असून गोदाम आणि वितरण केंद्रेही स्थापन करणार आहे.

२०१४ पासून रतन टाटा स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करत असून त्यांनी एल्तीरोज एनर्जी मध्ये पहिली गुंतवणूक केली होती. त्यानंतर अर्बन क्लॅप, लॅन्स कार्ट, अब्रा, डॉग स्पॉट, पेटीएम, ओला, फर्स्ट क्राय, लायब्रेट, होला शेफ, कार देखो, जेनेरिक आधार, ग्रामीण कॅपिटल, स्नॅपडील, ब्ल्यू स्टोन, अर्बन लॅडर, जीबामे, कॅश करो अश्या कंपन्यात गुंतवणूक केली आहे.