देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर


नवी दिल्ली : देशभरात 13 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तरी देखील देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे कोणतेही चित्र दिसत नाही. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2023 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1,67,457 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी शनिवारी 259,167 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत आहे. काल 62 हजार 97 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 83 हजार 856 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्के झाले आहे. दरम्यान, आज 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 1.55 एवढा झाला आहे.