पुण्यातील राजकारणात खळबळ : माजी खासदार संजय काकडेंना अटक


पुणे – कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणुक काढली होती. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी या मिरवणुकीला मदत केल्याची माहिती समोर आल्यामुळे गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे.

कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढली. जवळपास तीनशेहून अधिक चार चाकी वाहने या मिरवणुकीत सहभागी झाली होती. सोशल मीडियावर या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर तळोजा ते पुण्यापर्यंत येणाऱ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गजा मारणे आणि सहभागी झालेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही आलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आल्या. त्याच दरम्यान गजा मारणेला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

त्यानंतर गजा मारणेच्या मिरवणुकीमध्ये अनेक मोठ्या लोकांची नावे समोर आली आहेत. आता तर थेट भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी गजा मारणेला मिरवणुकी करिता मदत केल्या प्रकरणी आज गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे पुणे शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

गजा मारणे याची खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता.

गजा मारणे सहा मार्च रोजी गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच तो गजा मारणे असल्याची खात्री पटताच त्याला पोलिसांना शरण येण्यास सांगण्यात आले. यानंतर त्याला फिल्मी स्टाईलने त्याला पकडण्यात आल्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.