नाशिक दुर्घटना ; मोदींसह केंद्रातील मंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना


नवी दिल्ली – नाशिकमधील झाकीर हुसैन मनपा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. रुग्णालयाच्या आवारात आज दुपारच्या सुमारास टँकरमधून ऑक्सिजन गळती होण्याची धक्कादायक घटना घडली. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच दुसरीकडे ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांना प्राण गमावावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशाच्या पंतप्रधानांबरोबरच यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात खेद व्यक्त केला आहे.


नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी असून लोकांना या दुर्घटनेत प्राण गमावावे लागल्यामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सद्गभावना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी नाशिकमधील घटनेसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


नाशिकच्या मनपा रुग्णालयामध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीची घटना ऐकून दु:ख झाले आहे. या दुर्घटनेमध्ये ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्या कधीही न भरुन येणाऱ्या नुकसानीसाठी मी सद्भावना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


नाशिकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन गळती झाल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचे ऐकून वाईट वाटले. माझ्या सद्भावना मृतांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे ट्विटरवरुन गडकरींनी म्हटले आहे.


नाशिकमधील रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे काही लोकांना आपले प्राण गमावावे लागल्याचे ऐकून धक्का बसला आहे. या दुर्देवी घटनेत काहींना आपले प्राण गमावावे लागल्यामुळे मला फार दु:ख झाले आहे. या दु:खद प्रसंगी आमच्या सद्भावना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.