जपानने घेतला कोरोनावरील उपचार पद्धतीत भारतीय आयुर्वेदिक काढा वापरण्याचा निर्णय


मुंबई : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट पुन्हा एकदा ओढावले असून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक लस बाजारात आली. पण, असे असताना सुद्धा कोरोनाला रोखण्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. जगात आता कोरोनाची तिसरी लाट येऊ घातल्याचे संकेत मिळत आहे.

त्यातच आता कोरोनाचा तिसरा नवा स्ट्रेन सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तर डबल म्यूटेंटने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. तर आता कोरोनावर मात करण्यासाठी भारतीय काढ्याचा वापर करण्याचा निर्णय जपानने घेतला आहे. जपानमधील इजुमियोत्स या शहराच्या महापौरांनी कोरोनावरील उपचार पद्धतीत भारतीय आयुर्वेद काढा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्यातील वैद्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. पण, जपानने आयुर्वेदाला महत्व दिले आहे. कोरोनावरील उपचार पद्धतीला जपानने प्राधान्य देताना पुण्यातील डॉ. सुकुमार सरदेशमुख यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. कोरोनावर कोणतेही औषध नसल्यामुळे जगभरातील विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नैसर्गिक उपाचार पद्धतीला प्राधान्य देण्याचे जपानने ठरविले आहे. त्यासाठी नैसर्गिक, रसायनांशिवाय उपचारांना पसंती दिली आहे. त्यासाठीच भारतीय काढ्याचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोनावरील उपचारावर अभ्यास करण्यासाठी आणि संशोधनासाठी मदत व्हावी म्हणून अलीकडेच महापौर केनिची मिनामिडे यांनी ऑनलाईन चर्चासत्र घेतले. या चर्चासत्रात पुण्यातील वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांना तसे निमंत्रण देण्यात आले होते. वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी संशोधनाद्वारे तयार केलेल्या आयुर्वेदिक काढ्याचा चांगला उपोग होत असल्याचे नमूद केले. त्यांनी कोविड आणि कोविडोत्तर काळात या काढ्याचा आम्ही वापर करणार असल्याचे सांगितले. यावेळी जपान सरकारचे डॉ. मोटोको सातो आणि डॉ. माकिकी सातो या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी यावेळी सांगितले की, आम्ही तयार केलेला काढा चांगला आहे. आमच्या कंपनीने तयार केलेला काढा कोणी तरी त्यांना पाठवला. तो गुणकारी सिद्ध होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला चर्चासत्रासह सहभागी करुन घेतले. यामुळे आम्हाला याचा जास्त अभिमान आहे. तुळस, अश्वगंधा, सुंठ, दालचिनी, लवंग, गुळवे, ज्येष्ठमध या औषधी वनस्पतींचा त्यात वापर करण्यात आला आहे. एकात्मिक उपचार पद्धीत हा काढा वापरला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.