धोनीच्या आई-वडीलांना कोरोनाची लागण; उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल


रांची – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महेंद्रसिंह धोनी सध्या चेन्नईच्या संघासोबत आहे. इतर राज्यांप्रमाणे झारखंडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी झारखंड सरकारने लॉकडाउन लागू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याची तयारी केल्याचे चित्र दिसत आहे.

धोनीच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आलेल्या पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती स्थिर असून दोघांची ऑक्सिजन लेव्हल सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. उपचारांनंतर पुढील काही दिवसांमध्ये धोनीचे आई वडील ठणठणीत बरे होतील, असा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.