विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना क्लीन चिट


लखनौ – उत्तर प्रदेश पोलिसांना गँगस्टर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांना चकमकीत ठार केल्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना निवृत्त न्यायाधीश बी एस चौहान यांच्या चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. हे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. आठ पोलिसांना विकास दुबेने ठार केल्यानंतर पोलिसांनी बदला घेताना विकास दुबेला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप होता. पण उत्तर प्रदेश पोलिसांना क्लीन चिट मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायाधीश बी. एस. चौहान समितीने आठ महिने तपास केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांची बाजू खोटी ठरवणारा एकही साक्षीदार सापडला नाही. पोलिसांनी जुलै महिन्यात विकास दुबेला ठार केले होते. विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याला ठार केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले होते.