एअर इंडियाकडून २४ ते ३० एप्रिलदरम्यान ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमान सेवा बंद!


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण आणि त्याचबरोबर यामुळे होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. इतर काही देशांनी या पार्श्वभूमीवर भारतातून येणाऱ्या किंवा भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. त्यातच आता ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स एअर इंडियाने रद्द केल्या आहेत. हे नवे निर्बंध २४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान लागू असणार आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एअर इंडियाने ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने घातलेल्या निर्बंधांनंतर भारतातील आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि ब्रिटन यादरम्यान प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनी नोंद घ्यावी की यूकेकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यूकेला जाणाऱ्या किंवा यूकेहून येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट्स २४ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. लवकरच तिकिटांच्या परताव्यासंदर्भात निर्णय जाहीर केला जाईल, असे एअर इंडियाच्या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली आणि मुंबईहून यूकेला २४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये जाणारी एक फ्लाईट आठवड्यातून एकदा पाठवण्याचा विचार सुरू असून त्यासंदर्भात लवकरच कळवले जाईल, असे देखील एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.