ऑक्सिजन साठी मुकेश अंबानी यांनी अधिक सढळ केला मदतीचा हात 

रिलायंसच्या गुजराथ मधील जामनगर तेलशुद्धीकरण प्रकल्पात मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढविले गेले असून आता येथे रोज ७०० टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. हा ऑक्सिजन महाराष्ट्रासह देशातील अन्य कोविड १९ प्रभावित राज्यांना मोफत पुरविला जात आहे. हा ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी विशेष टँकर्स वापरले जात आहेत आणि त्याचा वाहतूक खर्च रिलायंस कडून केला जात आहे असे समजते. यामुळे गंभीर आजारी असणाऱ्या ७० हजार रुग्णांना मोठी मदत मिळणार आहे.

रिलायंस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जामनगर कारखान्यात यापूर्वी ऑक्सिजन उत्पादन केले जात नव्हते. येथे डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनाचे उत्पादन होते. मात्र करोना मुळे देशात ऑक्सिजन कमतरता निर्माण झाल्यावर विशेष उपकरणे बसवून मेडिकल ऑक्सिजन उत्पादन सुरु केले गेले. सुरवातीला येथे १०० टन उत्पादन होत होते ते आता ७०० टनांवर नेले असून आणखी काही दिवसात ते १००० टनांवर नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा ऑक्सिजन महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेश आणि अन्य काही राज्यांना पुरविला जात आहे.

इंडिअन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन या कंपन्याही त्याच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पात मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करत असून त्यांनीही विविध राज्यांना गरजेनुसार हा ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे.