येथे बनतेय जगातील सर्वाधिक उंचीवरचे क्रिकेट स्टेडियम

हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती जिल्हा क्रिकेट संघाने गेल्या सात वर्षांपासून चालविलेल्या प्रयत्नांना यश आले असून सिस्सू येथे क्रिकेट स्टेडियम उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अटल टनेल रोहतांगच्या उत्तर भागापासून ८ किमी अंतरावर ११ हजार फुट उंचीवर हे स्टेडियम बांधले जाणार असून त्याची प्रेक्षक क्षमता १० हजार असेल.

या संदर्भातली पहिली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थानिक पंचायत आणि महसूल विभागाने या साठी ३८ बिघे जमीन दिली असून वनविभागाकडून लेखी परवानगी येण्याची प्रतीक्षा आहे. जमीनीचे अधिग्रहण करण्याचे काम सुरु झाले आहे. सध्या जगातील सर्वाधिक उंचीवरचे क्रिकेट स्टेडियम हिमाचल मधील चायल येथे ७५०० फुट उंचीवर आहे. पतियाळा महाराजांनी १८९१ मध्ये हे स्टेडियम बांधले होते असे सांगतात.

सिस्सू येथील स्टेडियम मुळे लाहौल सह चंबा, मंडी, कुल्लू येथील क्रिकेट खेळाडूंना फायदा होणार आहे. भारतात एप्रिल ते सप्टेंबर या काळात प्रचंड उन्हाळा आणि पाउस यामुळे क्रिकेट सामने होऊ शकत नाहीत. अश्यावेळी सिस्सू येथील २० ते २५ डिग्री तापमान आणि पाउस जवळ जवळ नाही अश्या वातावरणात येथे युरोपीय देशांप्रमाणे क्रिकेट सामने होऊ शकणार आहेत.