केदार सह अनेक ठिकाणची बुकिंग पर्यटकांनी केली रद्द

उत्तराखंड राज्यात केदारनाथ सह चोपता भागातील अनेक पर्यटनस्थळांची बुकिंग पर्यटकांनी रद्द केली असून गेल्या आठवड्यात १० लाखाहून अधिक बुकिंग रद्द केली गेली आहेत. परिणामी येथील होम स्टे, हटस, कॉटेज, रेस्टॉरंट चालक, तेथे काम करणारा कर्मचारी वर्ग यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील पर्यटन व्यावसयिक यामुळे अडचणीत आले आहेत. गढवाल मंडळ विकास निगमचीही अनेक बुकिंग रद्द झाली आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पर्यटक प्रवास करण्यास धजावत नाहीत यामुळे अनेकांनी बुकिंग रद्द केली तर अनेकांनी पुढच्या तारखांची बुकिंग मागितली असल्याचे समजते. १४ मे रोजी अक्षयतृतीया असून या दिवशी यमुनोत्री, १५ मे रोजी गंगोत्री मंदिरे खुली होणार आहेत आणि या दिवसापासून चारधाम यात्रा सुरु होणार आहे. १७ मे रोजी केदारनाथ आणि पंच केदारपैकी तिसरे केदार तुंगनाथ यात्रा सुरु होत आहे तर १८ मे पासून बद्रीनाथ यात्रा सुरु होत आहे.

या वर्षी मोठ्या संखेने पर्यटक या स्थळांना भेट देतील अशी उमेद होती आणि त्यामुळे त्या दृष्टीने व्यावसायिकांनी तयारी सुरु केली होती. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेने या उमेदीवर पाणी पडले आहे. एकूण ३ कोटी बुकिंग पैकी आत्ताच १० लाख बुकिंग रद्द झाली आहेत. याच संखेने बुकिंग रद्द होत राहिली तर पर्यटन व्यवसाय आणि त्यात काम करणारे कर्मचारी यांची परिस्थिती फारच बिकट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.