रेमडीसिवीर साठीच्या कच्च्या मालावरील आयात कर रद्द, स्वस्तात मिळणार औषध

देशभरात करोना व्हायरसचे थैमान सुरु असतानाचा या संसर्गाच्या उपचारात महत्वाचे असलेले रेमडीसिवीर इंजेक्शन संदर्भात महत्वाची घोषणा केंद्राने केली आहे. देशात या औषधाची कमतरता जाणवत असल्याने वाढलेल्या किमती नियंत्रणात याव्यात आणि मुबलक प्रमाणात हे औषध सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावे यासाठी या औषध निर्मितीत लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरचे शुल्क माफ केले गेले आहे आणि या औषधाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन दुपटीने वाढविण्याचे आदेश दिले गेले आहेत.

मोदी सरकारने रेमडीसिवीर एपीआय, रेमडीसिवीर इंजेक्शन, बीटा सायक्लोडेक्सट्रीन (याचा वापर औषध बनविण्यासाठी केला जातो) यावरील आयात शुल्क माफ केल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केले आहे. यामुळे रेमडीसिवीर इंजेक्शनचा पुरवठा वाढण्यास, खर्च कमी होण्यास आणि रुग्णांना ते अधिक स्वस्त दरात मिळण्यास हातभार लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने त्यांच्या रॅमडॅक औषधाची किंमत २८०० वरून ८९९ वर आणली आहे. त्याचबरोबर सिंजीन इंटरनॅशनल लिमी, रेम्विनची किंमत ३९५० वरून २४५० वर, डॉ. रेड्डीजने रेडएक्स इंजेक्शनची किंमत ५४०० वरून २७०० वर, सिप्लाने त्याच्या सीआयपी रेमीची किंमत ४ हजारवरून ३ हजार वर, मायलेन फार्माने त्याच्या डीईबीआरईएम ची किंमत ४८०० वरून ३४०० वर तर ज्युबिलंट जेनेरिकने त्यांच्या जुबीआरची किंमत ४७०० वरून ३४०० वर आणली आहे. हेतेरी हेल्थकेअरने कोवीफोर इंजेक्शनची किंमत ५४०० वरून ३४९० वर आणली आहे.

केंद्राने या सर्व औषध निर्मात्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन दुपटीने वाढविण्याशी परवानगी दिली असून आत्तापर्यंत देशात रेमडीसीवीरची ३८.८ लाख युनिट बनत होती ती क्षमता आता ७८ लाखांवर जाणार आहे असे सांगितले जात आहे.