अमेरिकेचा आपल्या नागरिकांना भारताचा प्रवास न करण्याचे आवाहन


वॉशिंग्टन : कोरोनाची दुसरी लाट भारतात हाहाकार माजवत असताना जगभरातील इतर देश सावध झाले आहेत. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली असल्यामुळे त्या देशाचा प्रवास करु नये, असे आवाहन आपल्या नागरिकांना अमेरिकेने केले आहे. काल दिवसभरात देशात तब्बल 2.73 लाख नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना वरील आवाहन केले आहे.

कोरोनाचे भारतातील संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले असल्यामुळे त्या देशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अशा काळात आपल्या नागरिकांनी भारतात जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेने केले आहे.

तर दुसरीकडे ब्रिटनने भारतातील कोरोनाचे संकट पाहता भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. भारताची सदर यादीत नोंद झाल्यामुळे आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. त्याचबरोबर परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही येथे एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे. भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत.

यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचे नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता भारतीयांच्या ब्रिटन प्रवेशावर निर्बंध आले आहेत. दरम्यान, सदर निर्णयाच्या काही तासांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पुढील आठवड्यातील नियोजित भारत दौराही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2.73 लाख कोरोनाबाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच 1 हजार 501 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 1.38 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत.