तन्मय फडणवीस लसीकरण प्रकरण; भाजपचा शिवसेना आमदार, महापौरांना सवाल


मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्यावरून राज्यात बरेच वादंग निर्माण झाले. फडणवीस यांनाही त्यावरून सवाल करण्यात आले. ४५ वर्षापुढील व्यक्तींच्या गटात बसत नसताना तन्मय फडणवीस याने घेतलेल्या लसीच्या मुद्द्यावरून भाजपलाही लक्ष्य करण्यात आले. या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला भाजपनेही आता प्रत्युत्तर दिले आहे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर तन्मय फडणवीसने लस घेतल्याच्या प्रकरणावरुन टीका होत आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता, तर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीला कोरोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसं केलेले नाही. का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करत आहात? शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली होती, त्याचं आधी बोला, असा सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.