पुण्यातील योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू


पुणे – राज्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागल्यानंतर त्याचा संबंधित आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होणार अशी भिती वर्तवली जात होती. ती भिती आता खरी होताना दिसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, बेड्स यांचा तुटवडा राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आता ऑक्सिजनचा तुटवडा पुण्यात देखील जाणवू लागल्याची एक घटना समोर आली आहे. ऑक्सिजनअभावी पुण्यातील योग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजीत दरक यांनीच दिल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याचे भीषण वास्तव आता समोर येऊ लागले आहे. दरम्याना, गेल्या २ दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे देखील डॉ. अभिजीत दरक यांनी सांगितले आहे.

एका रुग्णाचा योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. याबाबत एएनआयशी बोलताना डॉ. अभिजीत दरक यानी सविस्तर माहिती दिली आहे. एका रुग्णाचा ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. लिक्विड ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे आम्ही गेल्या २ दिवसांपासून त्रस्त आहोत. रुग्णालयात सध्या ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि आमच्याकडे आत्ता फक्त तासभर पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे डॉ. दरक यांनी सांगितल्याची माहिती एएनआयने दिली आहे.


दरम्यान, डॉ. दरक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ आयसीयू बेड आणि २३ ऑक्सिजन बेड योग हॉस्पिटलमध्ये आहेत. २० ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचे आश्वासन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी योग हॉस्पिटलला दिले होते. पण, हा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालय प्रशासनाला नेमका कधी होईल, याची कोणतीही खात्री नाही. शिवाय, हे २० सिलेंडर आल्यानंतर देखील तो ऑक्सिजन फक्त पुढचे ३ ते ४ तास पुरेल, असे देखील डॉ. दरक यांनी सांगितले आहे.

आम्ही गेल्या वर्षभरापासून ५३ बेडचे कोविड सेंटर चालवत आहोत. गेल्या २ दिवसांमध्ये आम्हाला ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवला आहे. गेल्या २ दिवसांत आम्ही कसाबसा ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवला. पण आता ऑक्सिजन सिलेंडर कुठेही उपलब्ध होत नाहीत. आम्हाला किमान व्हेंटिलेटरवर असलेले आमचे रुग्ण दुसरीकडे शिफ्ट करावे लागणार असल्याचे देखील डॉ. दरक यांनी सांगितले आहे.