मनसे नेते अमित ठाकरेंना कोरोनाची लागण


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून ताप आणि खोकला असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्याचा आज रिपोर्ट आला असून यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमित ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून त्यांना प्रकृतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लवकरात लवकर बरे व्हा, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाने देशात पुन्हा एकदा थैमान घातले असून याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोनाची लागण अनेक राजकीय नेत्यांनाही होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मंगळवारी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.