ICSE दहावी बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसईसह (CBSE)देशातील अनेक राज्यांच्या बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत, तर काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

अशातच आता ICSE बोर्डाचाही यात समावेश झाला आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षा आयसीएसई बोर्डाने रद्द केल्या आहेत. दरम्यान, पहिल्यांदा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी पर्यायी ठेवण्यात आली होती. दरम्यान, आयसीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा 4 मेपासून सुरु होणार होत्या.

दरम्यान, आयसीएसई बोर्डाने (ICSE) यापूर्वीच बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. बोर्डाने सांगितले होते की, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जुनमध्ये परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे.