काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण


नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली असून याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर माझी कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यात माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.

राहुल गांधी यांना कोरोनोची लागण झाल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, आम्ही सर्वजण आपण त्वरित बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. या संकटाच्या वेळी देशाला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तुम्ही लवकरच बरे व्हाल. देश आपल्या जननेत्याची वाट पाहत आहे.

संपूर्ण भारत जेव्हा कोरोनाच्या तावडीत सापडला आहे, तेव्हा कोणीही त्यापासून अबाधित राहू शकत नाही, तुम्ही नेहमी योद्धयासारख्या प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आहे, माझा विश्वास आहे, की तुम्ही लवकरच कोरोनावरही मात कराल, युवक काँग्रेसचे लाखो कार्यकर्त्यांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. लवकर बरे व्हा भैया, असे ट्विट युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही.ने केले आहे.

कोरोनाची नवीन प्रकरणे राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोमवारी, 23,686 लोकांना कोरोनाची लागण झाली आणि 240 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.