लस उत्पादक सिरम आणि भारत बायोटेकला केंद्राकडून ४५०० कोटींची मदत

कोविड १९ लस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने लस उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट व हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपन्यांना सर्मथन दिले जात असल्याची घोषणा सोमवारी केली. त्यानुसार अर्थ मंत्रालय सिरम इन्स्टिट्यूटला ३ हजार कोटी आणि भारत बायोटेकला १५०० कोटीं असे एकूण ४५०० कोटींचे अर्थसहाय्य देणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी लस उत्पादनात वाढ करण्यासाठी ३ हजार कोटी आवश्यक आहेत असे म्हटले होते. फिक्कीने सुद्धा सरकारने देशात कोविड १९ चा प्रकोप पाहता लस उत्पादनात वाढ करण्यासाठी उत्पादन प्रोत्साहन राशी सरकारने द्यावी असा सल्ला दिला होता. त्यानुसार उत्पादन प्रोत्साहन प्रकार योजनेअंतर्गत हे पैसे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करण्यास सरकारने परवानगी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्राने जाहीर केलेले आर्थिक मदत पॅकेज महत्वाचे ठरणार आहे.