महिला अंतराळवीरांची खास कामगिरी

माणसाने अंतराळात झेप घेतली त्याला आता अनेक वर्षे लोटली. आता अंतराळात जाणे विशेष औत्सुक्याचा विषय राहिला नसला तरी या क्षेत्रात महिलांनी सुद्धा चांगली कामगिरी बजावली आहे. आत्तापर्यंत ६५ महिला अंतराळवीरांनी अंतराळात प्रवास करून अनेक महत्वाचे प्रयोग पार पाडले आहेत. कट्टर धार्मिक देशातील एक, म्हणजे युएई सरकारने सुद्धा महत्वाच्या अंतराळ मोहिमेसाठी आता २७ वर्षीय महिला इंजिनीअर नोरा मतरुशी हिची निवड केली असून ती अंतराळात मोहिमेत सहभागी होणारी पहिली अरब महिला ठरली आहे. तिला नासा मध्ये ३० महिने प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

अमेरिकेच्या अंतराळ मोहिमा अधिक चर्चेत असल्या तरी १६ जून १९६३ मध्ये रशियाची व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा हिने पहिली महिला अंतराळवीर म्हणून तिच्या नावाची नोंद केली आहे. इतकेच नव्हे तर ती जगातील सर्वात तरुण महिला अंतराळवीर सुद्धा बनली होती. अंतराळात झेप घेतली तेव्हा ती २६ वर्षाची होती. इतकेच नव्हे तर ती पहिली सोलो स्पेस ट्रॅव्हलर सुद्धा होती.

त्यानंतर १९८२ मध्ये रशियाच्याच स्वेतलानाने अंतराळ मोहिमेत भाग घेतला आणि ती दुसरी महिला अंतराळवीर ठरली. पण १९८४ मध्ये पुन्हा एकदा अंतराळात जाऊन तिने दोन वेळा ही कामगिरी बजावणारी महिला म्हणून इतिहास नोंदविला. ती पहिली स्पेस वॉकर सुद्धा होती. अमेरिकेची सॅली राईड हिने १९८३ मध्ये अंतराळवारी केली होती.

१९९५ पर्यंत अंतराळ मिशन राईडची जबाबदारी महिलांकडे सोपविली गेली नव्हती. पण २/२/१९९५ नासाच्या डिस्कव्हरी यानाच्या पायलट कमांडरची जबाबदारी आयरिश वंशीय अमेरिकी महिला कर्नल एलिन कॉलिन्स हिच्यावर सोपविली गेली आणि महिलांनी त्या मिशन मध्ये आणखी एक पाउल पुढे टाकले. टीचर इन स्पेस मिशन मध्ये हायस्कूल शिक्षिका क्रिस्टाची नासाने अंतराळ मोहिमेसाठी निवड केली. पण २८ जानेवारी १९८६ मध्ये स्पेस शटल चॅलेंजर दुर्घटनेत अन्य सहा अंतराळविरांबरोबर क्रिस्टाचा ही मृत्यू झाला.

पहिली भारतवंशी अमेरिकी अंतराळवीर बनण्याचा मान कल्पना चावला कडे जातो. १९९७ मध्ये तिने प्रथम अंतराळ मोहीम केली आणि २००३ मध्ये दुसऱ्या मोहिमेवर कोलंबिया यानातून पृथ्वीवर परतताना झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. सुनिता विलियम्स ही दुसरी भारत वंशी अमेरिकी महिला अंतराळवीर ठरली. स्पेस मध्ये सर्वाधिक दिवस राहण्याचा  विक्रम तिच्या नावावर आहे. तिने सात स्पेस वॉक केले आहेत. २००७ मध्ये स्पेस मध्ये मॅरेथोन पळणारी ती पहिली महिला आहे.