डॉमिनोज पिझ्झा ब्रांडवर सायबर हल्ला, युजर्स डेटा लिक

 

फोटो साभार द वीक

पिझ्झा चेन ब्रांड डॉमिनोज इंडियावर सायबर हल्ला झाला असून येथून मिळालेला डेटा डार्कवेबवर विकला जात असल्याचे समजते. या सायबर हल्ल्यात डॉमिनोजच्या १८ कोटी पेक्षा जास्त ऑर्डर डेटा शिवाय कंपनीच्या अनेक फाईल्स लिक झाल्या आहेतच पण डॉमिनोज ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणावर लिक झाली आहे. हॅकर्स कडून डार्क वेबवर या डेटाची ४.२५ कोटी मध्ये विक्री केली जात असल्याचा दावा केला गेला आहे.

या महिन्याच्या सुरवातीला हा सायबर हल्ला झाला मात्र त्याची माहिती ग्राहकांना दिली गेली नाही. सायबर सिक्युरिटी फर्म हडसन रॉकचे प्रमुख अलन गल यांनी ट्विट करून या हल्ल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ग्राहक डेटा बरोबरच कंपनीच्या २५० कर्मचाऱ्यांची माहिती आणि फाईल्स सुद्धा हॅक झाल्या असून त्याचे प्रमाण १३ टीबी साईज इतके आहे.

या लिकमध्ये ग्राहकांच्या १० लाख क्रेडीट डेबिट कार्ड तपशील, मोबाईल नंबर, नाव, ई मेल आयडी, पत्ता, पेमेंट डीटेल्स अशा माहितीचा समावेश आहे शिवाय १८ कोटी ऑर्डर्सचे पूर्ण डीटेल्स आहेत. कंपनीच्या २०१५ ते २०२१ या काळातील फाईल्स चोरी झाल्या असून डार्क वेबवर हॅकर्सच्या मेसेज नुसार या डेटाचा सर्च पोर्टल बनविला जात आहे. युजर्स तेथे डेटा सर्च करू शकतील असे समजते. डॉमिनोज इंडिया ज्युबिलंट फूडवर्क कडून ऑपरेट केले जाते. त्यांच्याकडे याची फ्रांचाईजी आहे.