एलोन मस्क- नासा करार, जेफ बेजोसना फटका

स्पेस एक्सचे मालक आणि टेस्ला सीइओ एलन मस्क यांनी नासा बरोबर मून मिशन म्हणजे चंद्र मोहिमेसाठी २.८९ अब्ज डॉलर्सचा करार केला असल्याचे समजते. या कराराअंतर्गत मस्क ५० वर्षे नासाच्या अंतराळवीरांना चंद्रावर नेण्यासाठी स्टार शिप बनविणार आहेत. नासा त्यांच्या आर्टेमिस मिशन साठी मोठ्या प्रमाणावर मस्क याना ऑर्डर देत आहे. त्यामुळे मस्क यांचा नक्कीच फायदा झाला असला तरी अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस याना मात्र त्यामुळे मोठा फटका बसणार आहे.

बेजोस यांच्या रॉकेट कंपनी ब्ल्यू ओरिजिन कडून नासा बरोबरच्या या करारासाठी प्रयत्न केले जात होते. बेजोस यांनी त्यासाठी लॉकहिड मार्टीन आणि नॉर्थरोप ग्रूमन बरोबर राष्ट्रीय टीम बनविण्याचा प्रस्ताव नासा ला दिला होता. सीएनएन च्या बातमीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नासाच्या २०२४ मधल्या चांद्र मोहिमेत अश्वेत अंतराळवीराचा समावेश केला जावा असा निर्णय घेतला आहे. मस्क यांच्या अंतराळ यानाचे नाव स्टार शिप असून याच स्टार शिप मधून मंगळावर जाण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. आर्टेमिस मिशन मध्ये पहिली महिला अंतराळयात्री चंद्रावर पाठवून नासा इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे.