करोना संक्रमिताच्या सहाय्यास २४ तास आरएसएसचे स्वयंसेवक

देशात करोनाचा झालेल्या उद्रेक लक्षात घेऊन करोना संक्रमिताच्या मदतीची पूर्ण तयारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. आरएसएसचे स्वयंसेवक स्वतःची काळजी घेऊन करोना संक्रमिताच्या मदतीसाठी चोवीस तास काम करणार आहेत. त्याच्या समन्वयासाठी देशातील सर्व प्रांत आणि क्षेत्रात १-१ प्रमुख नेमला गेला आहे. अशा ६० प्रमुखांचे मोबाईल नंबर जारी करण्यात आले असून गरजूंनी त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

या योजनेनुसार सर्व प्रमुख आपापल्या राज्यात सर्व जिल्ह्यात ३ ते ५ स्वयंसेवकांची टीम तयार करत असून हे काम सुरु झाले आहे. या सर्व सदस्यांचे मोबाईल नंबर लवकरच जाहीर केले जात आहेत असे समजते. महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश सहित अनेक राज्यात हे मदत कार्य अगोदरच सुरु केले गेले आहे. राष्ट्रीय सेवा भारती या सर्व कामावर देखरेख करत आहे.

राष्ट्रीय सेवा भारतीचे प्रमुख श्रवणकुमार म्हणाले आम्ही प्रामुख्याने आयसोलेशन सेंटर उभारण्यावर भर देत आहोत. प्रशासनाच्या मदतीने महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथे अशी अनेक केंद्रे बनविली गेली आहेत. त्यासाठी विद्याभारतीच्या शाळा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. या सर्व केंद्राना कोणत्या ना कोणत्या हॉस्पिटलशी जोडले गेले आहे. येथे २४ तास स्वयंसेवक मदतीसाठी तैनात केले गेले आहेत. ते संक्रमिताना औषधे देणे, भोजन पुरविणे, बाकी मदत करणे अशी कामे करत आहेत. काही ठिकाणी गरजेनुसार शव दहन करण्यासाठीही मदत केली जात आहे.