रामनवमीला अयोध्येत राम जन्मभूमीत भक्तांना बंदी


अयोध्या – देशात वाढत असलेल्या कोरोना प्रकोपामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत असून अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनची स्थिती उद्धभवली आहे. ६ दिवसांचा लॉकडाऊन दिल्लीत लावण्यात आला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत उत्तर प्रदेशातही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने रामनवमीला राम जन्मभूमी मंदिरात भक्तांना प्रवेश बंदी केली आहे. हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रने ही माहिती ट्वीट करून दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्रीराम जन्मभूमी परिसरात प्रभू रामांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. पण या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून ट्विटरवर सांगण्यात आले आहे.

रामनवमीला राम जन्मभूमीत जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अयोध्या नगरीला आकर्षक रोषणाई केली जाते. मंदिर परिसर फुलांनी सजवला जातो. या सोहळ्याला भक्तही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. पण यावेळी कोरोनामुळे अयोध्येत भक्तांना परवानगी नाकारण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अयोध्येतील यात्राही रद्द करण्यात आली आहे. साधुसंत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भक्तांना अयोध्येत न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अयोध्येतील संत समाजाने नागरिकांना घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.