फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर खरेदी केले याची चौकशी करा


नवी दिल्ली – मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठले आणि संताप व्यक्त केला. यावेळी त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे. दिग्विजय सिंग यांनी ट्विट केले असून हा अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे.


ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, खर तर, कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर फडणवीसांनी खरेदी केले, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच त्यांनी कोणाच्या परवानगीने हे केले याची देखील चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी बाब आहे.

दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे १२ एप्रिलला दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना ५० हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.