उच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारला ५ मोठ्या शहरांमध्ये २६ एप्रिलपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश


लखनौ – कोरोनाबाधितांची उत्तर प्रदेशमधील वाढती संख्या लक्षात घेता आज मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यातील पाच मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रयागराज, लखनऊ, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूरमध्ये २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. हा निर्णय म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना नियोजनाला मोठा धक्का देणारा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे. २०,२२,२३ आणि २४ एप्रिल रोजी न्यायालयाचे काम होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच न्यायालयातील मुख्य खंडपीठाने आणि लखनऊ खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला. या कालावधीमध्ये प्रत्यक्षात किंवा ई-फायलिंगच्या माध्यमातून कोणताही अर्ज दाखल करुन घेतला जाणार नाही. उच्च न्यायालयाने हा आदेश राज्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पाहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

केवळ आपत्कालीन प्रकरणांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून २६ एप्रिल रोजी सुनावणी केली जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने लखनऊ आणि प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्री कार्यालयाला लॉकडाउन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनचा योग्य पद्धतीने पुरवठा करण्यासंदर्भातीलही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कोरोना नियंत्रणासंदर्भातील उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या कोरोना सुरक्षा आणि नियोजनासंदर्भातील समितीने हे आदेश दिले आहेत. हे आदेश न्यायालयाचे रजिस्टार प्रोटोकॉल आशीष कुमार श्रीवास्तव यांनी जारी केले आहेत.