तुमचे व्हॉट्सअॅप गुलाबी रंगाचे होणार या मेसेजला चुकूनही करु नका क्लिक


नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप इंस्टंट मेसेजिंग अॅपवर सध्या एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात म्हटले की Whatsapp आता हिरव्या रंगात नाही तर पिंक म्हणजेच गुलाबी रंगात बदलण्यात येणार आहे. पण हा दावा करताना एक लिंक सुद्धा दिली आहे. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. तुम्ही जर या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात येत आहे की, तुमचे व्हॉट्सअॅप या लिंकवर क्लिक केल्यानंतर गुलाबी रंगाचे होईल. तसेच त्यात नवीन फीचर्स सुद्धा जोडले जातील. याला व्हॉट्सअॅपचे अधिकृत अपडेट सांगितले जात आहे.

पण सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, व्हॉट्सअॅप पिंकसंबंधी कोणतीही लिंक आल्यास तुम्ही सावध राहा. एपीके डाउनलोड लिंक सोबत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर यांनी सल्ला दिला आहे की, व्हॉट्सअॅप पिंकच्या नावावर आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका.

लिंकला क्लिक केल्यानंतर फोन हॅक होत असून तुम्हाला तुमचा फोन वापरणे अवघड होईल. सायबर सुरक्षा संबंधित कंपनी वोयागेर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन यांनी म्हटले की, युजर्संना सल्ला देण्यात येत आहे की, ते गुगल किंवा अॅपलच्या अधिकृत अॅप स्टोर शिवाय एपीके किंवा अन्य मोबाइल अॅपला इन्स्टॉल करू नका. या प्रकाराने तुमचे फोटो, एसएमएस, संपर्क आदी चोरी केले जाऊ शकते.