काही कारणांमुळे कोरोना लसीकरणाचा प्रभाव होऊ शकतो कमी; एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली भीती


नवी दिल्ली – सध्या देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशामध्ये काल दिवसभरात २.७० लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर सध्या जगातील इतर भागांप्रमाणेच भारतामध्येही कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. पण कोरोनाच्या लसीकरणाचा प्रभाव काही कारणांमुळे कमी होऊ शकतो, अशी भीती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.

गुलेरिया म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी दोन उपाय महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे औषध आणि औषध देण्याची वेळ. जर तुम्ही औषध लवकर दिले किंवा उशिरा दिले तर त्यातून फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. अनेक औषधांना एकत्र करून दिल्यास अशा प्रकारामुळे बाधिताचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. रिकव्हरी ट्रायलमधून कोरोनाबाधितांना स्टेरॉइड देणे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. पण स्टेरॉइड ऑक्सिजनची पातळी कमी होण्यापूर्वी दिल्यामुळे त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. तसेच वेळेआधीच स्टेरॉइड देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर अधिक असल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.