कोरोनाचे थैमान कायम; बाधितांची तीन लाखांच्या आकड्याकडे वाटचाल


नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान अद्याप कायम असून, कोरोनाने जवळपास सर्वच राज्यांमध्ये हातपाय पसरले आहेत. सगळीकडे बेड आणि ऑक्सिजनसाठी रुग्ण आणि नातेवाईकांची धडपड सुरू असून, सोमवारी आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येचा विस्फोट झाल्याचे दिसून आले असून, त्याचबरोबर नवा उच्चांकही नोंदवला गेला आहे. देशात दैनंदिन रुग्णसंख्येत सलग ४० व्या दिवशी वाढ नोंदविण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आकडा जाहीर केला असून, देशात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर यात चिंतेत टाकणारी गोष्ट म्हणजे देशात अवघ्या २४ तासांत मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे केंद्रीय मंत्रालयाने जाहिर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७३ हजार ८१० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून याच कालावधीत देशात १ हजार ६१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण रविवारी दिवसभरात कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृत्यूचा आकडा आता १ लाख ७८ हजार ७६९ वर पोहोचला असून, १२,३८,५२,५६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

रुग्णालयातील सुविधांवर वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रचंड ताण येऊ लागला आहे. बेड, आयसीयू बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासह रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाल्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासह काही राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे.

पंतप्रधानांशी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून पत्रव्यवहार केला जात आहे. ऑक्सिजन तुटवडा आणि इतर सुविधांकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारला पाच महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.